काय सुरू आहे, सगळंच आकलनक्षमतेच्या पलीकडच.. एवढा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने का बरं माझा प्रवास हा प्रश्न पुन्हा पुन्हा मनात विचारांचे झंझावात निर्माण करतोय आणि गोंधळले मी… त्या प्रश्नाला तिथंच वादळात सोडून पुन्हा त्या रोमांचक प्रवासात गुंग
कित्येक वर्ष उलटली पण ही गोष्ट निरंतर चालूच; पण आज मात्र तो प्रश्न हट्टाला पेटलेला दिसतोय. उत्तर दिल्याशिवाय मनपटलावरून जाणार नाही म्हणतोय.
अरे वेडया, मी कसं समजावू तुला ? हृदयाला उमगणार नाहीत आणि मनाच्या गाभाऱ्यात सामावणार नाहीत, इतकी उंच स्वप्न घेऊन हे इवलेसे डोळे सतत त्या अथांग रत्नाकरात, त्या अगणित चंदताऱ्यात काहीतरी शोधताहेत. हया भव्य कोलाहलात त्यांना ज्याची ओढ आहे ते सापडलं नसावं कदाचित
कधी कधी वाटतं हया निरंतर शोधातच जगण्याची उत्सुकता तेवत राहत असेल काय; गाभाऱ्यात निरंतर तेवणाऱ्या त्या पणती प्रमाणे ! जर ती कस्तुरी हाती लागली तर हा मृग जिवाच्या आकांताने धावणं सोडूनच नाही का देणार ? त्याच्या न उलघडण्यामुळेच हे जीवन एक उत्सव आहे आणि प्रत्येक
आगामी क्षण एक रहस्य ! माझ्यालेखी या चढउताराच्या प्रवासात ना हृदयाचं वर्चस्व चालतं ना मेंदुच थोड्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या तर तुम्हालाही जाणवेल की या रथाला नियंत्रित करणारा तिसराच कोणीतरी आहे.
नाही, तो बिलकुल अपरिचित नाही. तोच तो सुप्रसिद्ध सारथी, तो परमात्मा, त्याचाच हा अंश, आत्मा!
ह्या आश्चर्यजनक वाटणाऱ्या खुलाश्यात तसं नवल वाटण्यासारखं काही नव्हेच. होय, त्या परमपित्याचा तेजांशच वाहतोय माझ्या तेजस्वी धमन्यांतून पण विरोधाभास असा की मला विसर पडलाय बहुधा त्या उगमत्वाचा जन्मदात्या समुद्रापासून विलग होऊन किनाऱ्यावरतीच निपचित पडलेल्या त्या दुर्भागी शिपल्यांसारखा.
ही मायानगरी पण रचली त्यानेच; पण हताश होण्याची काही बाब नाही. कारण ही माया तात्पुरती आहे : अगदी पुढच्या क्षणी भंग होईल. चिरकाल काय असेल तर तो संभवतः निश्चल दिसू पाहणारा महाकाय रत्नाकर.
एकाएकी एक दिव्य लाट उसळेल आणि या शिंपल्याला पुन्हा आपुल्या
उदरात सामावून घेईल अखेर तोही अधीरच आहे की मला छातीशी कवटाळायला; बरं का रे मना, त्याच लहरीची आस मला.
ती बघ ती उसळताना दिसत आहे त्या गहन भयावह काळोखात.. कुठेतरी दूर त्या अगणित तारकांच्या कुंजात ! तीचीच रे प्रतिक्षा . तीचाच रे ध्यास मनी सदा.
मला,किमया त्याची ही ; जर एकरूप व्हायचं असेल मला त्या जलतरंगाशी,
तर प्रवाहाच्या उलटच दिशा निवडावी लागेल.
एक गोष्ट मात्र पक्की; अगदी काळ्या दगडावरच्या रेशेहूनही अधिक त्या प्रवाहाला त्याचा जलाधि प्राप्त होईल की नाही; खरंच माहित नाही. परंतु माझी प्रामाणिक साधना रोज मला सांगते की माझे आणि त्या परमतत्वाचे मिलन मात्र अटळ !!
|| न कंचित् शाश्वतम् ||